जागतिक मुद्रण दिवस – २४ फेब्रुवारी

आज २४ फेब्रुवारी…जागतिक मुद्रण दिवस (World Printing Day)
का साजरा केला जातो…व त्याचे महत्व..?
मानवजातीचे प्रबोधन वेगाने घडवून आणणारे तंत्रज्ञान म्हणजे मुद्रण कला…मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांचा आज २४ फेब्रुवारी जन्मदिन. हा दिवस…जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. गुटेनबर्ग ह्यांनी मुद्रण कलेचा शोध लावला म्हणून आज आपण वैचारिक दृष्टया समृद्ध आहोत. मुद्रण पद्धतीचा शोध चीनमध्ये लावला गेला. त्या काळी उपकरणे म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवायचे. या मध्ये धार्मिक मजकूर लिहायचे.
इसवी सन १४३४ ते १४३९ हा काळ मुद्रण क्षेत्रासाठी महत्वाचा काळ होता. मुद्रणेच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला खूप अडचणी येत असत. अक्षरे वाकडी दिसणे, न उमटणे, गाळली जाणे इत्यादी.
जोहान्स गुटेनबर्ग यांच्याबद्दल थोडेसे..? मूळचा चांदीचा व्यवसाय असल्याने चांदीचे दागिने व मोहरा यांच्यावर छापकाम करण्याचे तंत्र गुटेनबर्ग यांना अवगत होते. त्यांनी इ. स. १४३४-३९ या काळात धात्वलेखी मुद्रणाचा शोध लावला आणि योहान फुष्ट ह्यांच्या समवेत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. स्ट्रासबर्गला मुद्रणाचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी गुटेनबर्ग यांनी एका वेगळ्या प्रकारचे यंत्र तयार केले. टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील गुटेनबर्ग यांनीच लावला. त्याच्या आधारे पहिल्यांदा बायबल ग्रंथाची छपाई करण्यात आली. इ.स. १४५० मध्ये गुटेनबर्ग यांनी अक्षरांचे सुटे खिळे बनवण्याचा शोध लावला. त्यामुळे त्यांना मुद्रण कलेचा जनक मानले जाते. मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांना यादिवसानिमित्त मानाचा मुजरा..!
भारतामध्ये मुद्रण कला १५५६ साली आली. सर्वप्रथम पुर्तगाल मधून छापखाना गोव्यात जहाजाने आणला गेला आणि भारतातील पहिली मुद्रण शाळा (प्रिंटिंग प्रेस) ही संत पॉल कॉलेज, ओल्ड गोवा मध्ये सुरू करण्यात आली (१५५६). या तंत्राने लोकांमध्ये धर्मांतर करण्याचा मुख्य हेतू होता.
महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली मुद्रण शाळा सुरू झाली, ती एका गुजराती व्यापाऱ्यामुळे; ते होते भीमजीभाई पारेख. १६७४-७५ साला दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रातली पहिली मुद्रण शाळा सुरू केली. व्यवसायाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीशी करारबद्ध असलेले भीमजीभाई, नंतरच्या काळात इंग्रजांच्या हिंदूंवरील अत्याचाराला उत्तर म्हणून त्यांनी १६८० पासून मृत्यूपर्यंत (१६८६) स्वातंत्र्य प्रेरक व हिंदू विचारांचे मजकूर छापण्याचे व्रत ठेवले.
इसवी सन १८३९ मध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी मराठी भाषेत शिळाछापावर पुस्तके छापण्यासाठी छापखाना सुरू झाला होता. यासाठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले. या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले; त्यांनी देवनागरी आणि गुजराती भाषांचे सांचे बनवून मातृका तयार केल्या. त्यांच्याकडून अमेरिकन मिशन मुद्रणालयातच काम करणारे गणपत कृष्णाजी पाटील मातृका बनविण्यास शिकले.
मिशनऱ्यांची धर्मप्रवर्तक पुस्तके पाहिल्यानंतर १८४० च्या सुमारास गणपत कृष्णाजी यांच्या मनातही असा छापखाना सुरू करून हिंदूू धर्मविषयक पुस्तके प्रकाशित करावी असा विचार आला. स्वत:च्या हिमतीवर १६ मार्च १८४१ या दिवशी गणपत कृष्णाजी पाटील यांनी स्वहस्ते पंचांग लिहून काढून ते चुनखडकावर (शिळाप्रेसवर) समपृष्ठ छपाई करून छापून प्रकाशित केले होते. या पंचांगाच्या एका प्रतीची किंमत अवघी आठ आणे इतकी होती. छापील स्वरूपातील हे सर्वात पहिले पंचांग सुरुवातीला समाजाकडून स्वीकारले गेले नाही. कर्मठांचा त्याला विरोध होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि छापील पंचांगाचा वापर करायला सुरुवात झाली. पुढे अक्षर मुद्रणालय देखील त्यांनीच सुरू केले. भारतीय मुद्रणक्षेत्रातील महत्त्वाचा पाया गणपत कृष्णाजी पाटील यांनी घातला हे विसरून चालणार नाही..!!
मुद्रणकलेत झालेले बदल…▪️ ब्लॉक प्रिंटिंग.▪️ स्टेंसिल.▪️ हलविता येणारे टाईप.▪️ रोटरी प्रिंटिंग.▪️ लिथो प्रिंटिंग.▪️ रंगीत प्रिंटिंग.▪️ ऑफसेट प्रिंटिंग.▪️ स्क्रिन प्रिंटिंग.▪️ फ्लेक्सओग्राफी.▪️ फोटोकॉपीयर.▪️ लेझर मुद्रण.▪️ डॉट मॅट्रिक्स प्रिंटिंग.▪️ डिझिटल प्रेस.
मुद्रण कलेचा विकास झाल्यानंतर काहीच दिवसांत संगणकावर मुद्रणाचे तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण अतिशय सोप्या आणि कमी वेळात पूर्ण होऊ लागले. त्यानंतर काही वर्षात संगणकाच्या विकासासोबतच इंटरनेटचा विकास झाला. त्यानंतर हळू-हळू सोशल मीडियाचाही विकास होत गेला. अशा पद्धतीने मुद्रण कलेचा विकास होत गेला. आज आपण सोशल मीडिया किंवा संगणकावर अगदी सहजरित्या टाईप करू शकतो. या सर्व विकासामागे अनेक संशोधकांचे कष्ट आहेत. त्यामुळे आज मुद्रण दिनाचे औचित्य साधून त्या सर्व संशोधकांच्या कार्याला सलाम करूयात..!
जागतिक मुद्रण दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा…🙏🌹
सौदार्य: श्री राहुल प्रकाश बडगुजर, श्री परेश प्रकाश बडगुजर (मुद्रण व्यावसायिक, पुणे)
फर्म: नर्मदा ऑफसेट आणि व्हिजन कॉपीयर्स; नारायण पेठ/वारजे नाका/नऱ्हे, पुणे. (संपर्कध्वनी: 9423570019, 8087612148)
